थेट दर्शनासाठी पैसे उकळणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी
थेट दर्शनासाठी पैसे उकळणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी
तुळजापूर | प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांकडून थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी मंदिर संस्थानने कठोर कारवाई करत दोन जणांवर पाच वर्षांची मंदिर प्रवेशबंदी घातली आहे. संबंधितांना पुढील पाच वर्षे मंदिर परिसरात प्रवेश करता येणार नसल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
३ जून रोजी एका मराठी वृत्तवाहिनीवर मंदिरातील काही व्यक्ती भाविकांकडून थेट दर्शनासाठी पैसे घेत असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने चौकशी करून अभिषेक अशोकराव साळुंखे आणि हर्षल विनोद चव्हाण या दोघांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले आहे.
मंदिर संस्थानने भाविकांची फसवणूक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली असून हे पथक मंदिर परिसरात नियमित पाहणी करत आहे. अनधिकृत पुजारी व्यवसाय करणारे, दर्शनाच्या नावाखाली पैसे उकळणारे किंवा मंदिराच्या अधिकृत व्यवस्थेबाहेर काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.
भाविकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच धार्मिक विधी व पूजा केवळ अधिकृत पुजाऱ्यांकडूनच पार पडाव्यात, यासाठी संस्थान कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, दर्शनासाठी किंवा धार्मिक विधींसाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नयेत, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही संस्थानने दिला आहे.