एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

 मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सरनाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आर्थिक व प्रशासकीय मागण्या मांडल्या. त्यावर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देत महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामंजस्याने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक