धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका, आरोपींवर गुन्हा दाखल
धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका, आरोपींवर गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापाराविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली असून संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाराशिव शहरातील ओरा (Aura) स्पा सेंटर येथे अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी प्रथम पंटरच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर शासकीय पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषणाचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यामध्ये एकूण पाच महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके (AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके तसेच महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव व चालक यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली असून बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर कडक पाळत ठेवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.