महेश देशमुख रिंगणात; महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर
महेश देशमुख रिंगणात; महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही देत ही निवडणूक जनतेच्या हक्कांसाठीची लढाई असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन करून महेश देशमुख यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली. राज्यात आणि देशात अराजकतेचे राजकारण सुरू असून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीसारख्या गंभीर घटनांमुळे तरुणांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महेश देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार हे सुशिक्षित, जागरूक आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विचार आणि विकासाचे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती; मात्र पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येणार असून विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशनसह विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठविला असून समान निधी वाटपाच्या मुद्द्यावरही प्रयत्नशील राहिलो असल्याचे महेश देशमुख यांनी नमूद केले. विकासकामांच्या अंमलबजावणीत प्रादेशिक समतोल राखण्यासाठी विधान परिषदेत प्रभावी भूमिका बजावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवर टीका करत वाढती महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असून जनतेच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी दाखल करताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आमदार प्रविण स्वामी, आमदार प्रशांत स्वामी, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, अभय साळुंके, राहुल सोनवणे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता शहापूरकर, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, आशाताई भिसे, तनुजा हेड्डा, खालिफा कुरेशी, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, सचिन बंडापल्ले,खालील सय्यद, पांडुरंग कुंभार, दिलीप शाळू ,राजाभाऊ शेरखाने,अजहर पठाण,आयाज शेख,इस्माईल शेख,शेखर घोडके,पंकज भोसले, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, महेबुब पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.