अळणी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; १२ जण ताब्यात, सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अळणी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; १२ जण ताब्यात, सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
दिशा धाराशिव,( प्रतिनिधी)दि. ८ जून: जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, धाराशिव नजीक अळणी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक छापेमारी करून १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य, वाहने व इतर वस्तूंसह एकूण २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली. लातूर-ढोकी रोडवरील अळणी येथील दर्शन बियर बार अँड परमिट रूम’ च्या आडोशाने अवैधरित्या तीन पत्ती (तिरट) जुगार क्लब चालविण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, तसेच क्यूआरटी (QRT) व आरसीपी (RCP) पथकाच्या मदतीने नियोजनबद्ध छापेमारी करण्यात आली. संबंधित ठिकाणी पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन जुगार खेळवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.विशेष म्हणजे, सदर जुगार अड्डा बारच्या मागील बाजूस चहूबाजूंनी शेतांनी वेढलेल्या ठिकाणी असल्याने तो सहज नजरेस पडत नव्हता. मात्र पोलिसांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे संशयितांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.कारवाईदरम्यान १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते, कॉईन्स, मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने, चार दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य असा एकूण रु. २१,९०,३०५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे मानले जात असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.