“सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात” सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

 “सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात”  सर्व्हिस रोड बंद केल्याने संताप

राहुल कोरे आळणीकर 

धाराशिव शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर एका सर्वपक्षीय लाडक्या आणि प्रभावशाली ठेकेदारामुळे गंभीर अडथळा निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक वर्षांच्या आंदोलनांनंतर आणि संघर्षानंतर नागरिकांच्या वापरासाठी कसा का असेना तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड पुन्हा एका ठिकाणी मुरूम टाकून अडवण्यात आल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

गणेशनगर परिसराच्या मागील बाजूस असलेल्या लाडक्या ठेकेदाराच्या गोडाऊनकडे जाण्यासाठी संबंधित ठेकेदाराने हायवेपासून थेट सर्व्हिस रोडवर मुरूम टाकून रस्ता बंद केल्याचे समोर आले आहे. या अडथळ्यामुळे दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रोड पूर्णपणे बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लहान वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेकांना मुख्य हायवेवर येऊन पुन्हा वळसा घ्यावा लागत आहे.

या प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीचा अनियंत्रित धोका निर्माण झाला असून अपघाताचा गंभीर धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “हायवेवरून थेट येणारी वाहतूक आणि बंद केलेला सर्व्हिस रोड यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो,” अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित ठिकाणी ठेकेदाराचे राजकीय पाठबळ असल्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे “सर्वपक्षीय लाडका ठेकेदार” अशी ओळख निर्माण झाल्याचा उल्लेख नागरिकांमध्ये चर्चेत आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड एका व्यक्तीच्या फायद्यासाठी अडवला जात असल्याने “धाराशिवकरांचा जीव धोक्यात का टाकला जात आहे?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व्हिस रोडवरील अडथळे दूर करून तो पूर्ववत खुला करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक