गोरगरीबांचे आश्रयदाते पवनराजे... वारसा समर्थपणे जपत आहेत ओमराजे आणि जयराजे
गोरगरीबांचे आश्रयदाते पवनराजे... वारसा समर्थपणे जपत आहेत ओमराजे आणि जयराजे
काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि जनतेशी असलेले नाते काळाच्या पडद्याआड कधीच जात नाही. कै. पवनराजे निंबाळकर हे असेच एक लोकनेते होते. गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारा, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा हा लोकनेता आजही जनतेच्या हृदयात जिवंत आहे.
आज नियतीने पवनराजे निंबाळकर यांना आपल्यातून हिरावून नेऊन तब्बल 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दशके उलटली, काळ पुढे सरकला, अनेक राजकीय समीकरणे बदलली; मात्र गोरगरीबांच्या मनातील पवनराजेंचे स्थान आजही तसूभरही कमी झालेले नाही. त्यांच्या आठवणी आजही जनतेच्या मनात ताज्या आहेत. गावागावात, शेतशिवारात आणि सर्वसामान्यांच्या चर्चेत आजही पवनराजे जिवंत आहेत. कारण काही व्यक्ती काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, पण काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यामुळे जनमानसात कायमची अजरामर होतात. पवनराजे हे त्यापैकीच एक होते.
पवनराजे यांचे अकाली निधन हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा आणि हजारो गोरगरीबांचा वैयक्तिक आघात होता. त्यांच्या जाण्याने अनेकांना आपला आधारवड हरवल्याची भावना झाली. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर आणि शेतशिवारात आजही पवनराजेंच्या आठवणी प्रेमाने सांगितल्या जातात. कारण त्यांनी सत्ता, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा माणसांना अधिक महत्त्व दिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे हाच त्यांच्या राजकारणाचा खरा धर्म होता.
मात्र नियतीने पवनराजेंना आपल्यातून हिरावून घेतले असले, तरी त्यांचा विचारांचा आणि जनसेवेचा वारसा थांबला नाही. हा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या सुपुत्रांनी आपल्या खांद्यावर घेतली. थोरले सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे पवनराजेंचा राजकीय वारसा तेवढ्याच ताकदीने पुढे नेताना दिसत आहेत, तर धाकटे सुपुत्र जयराजे निंबाळकर हे पवनराजेंनी जपलेला दानधर्म, समाजसेवा आणि गोरगरीबांप्रती असलेली आपुलकीचा वारसा आजही अविरतपणे जपत आहेत.
आज ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहताना अनेकांना पवनराजेंचीच छबी दिसते. वडिलांप्रमाणेच जनतेशी जोडलेली नाळ, लोकांमध्ये मिसळण्याची सहजता, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता आणि प्रत्येक अडचणीत लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची वृत्ती यामुळे ओमराजे जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहेत.
संसदेपर्यंतचा प्रवास त्यांनी जनतेच्या विश्वासाच्या बळावर केला. आज दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येणे ही केवळ राजकीय यशाची बाब नाही, तर जनतेने त्यांच्या कार्यावर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. जनतेने दिलेल्या या प्रेमाची उतराई करण्यासाठी ओमराजे आपले चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी वाहून घेत आहेत. मतदारसंघातील प्रश्न असोत, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत किंवा सामान्य नागरिकांच्या समस्या असोत, त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे जयराजे निंबाळकर हेही वडिलांच्या समाजसेवेच्या विचारांना कृतीत उतरवत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे, सामाजिक उपक्रमांना हातभार लावणे आणि दानधर्माची परंपरा जिवंत ठेवणे यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयीही विशेष आपुलकी निर्माण झाली आहे.
पवनराजे यांनी आयुष्यभर माणसे जोडली, विश्वास कमावला आणि जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. आज त्याच मार्गावर चालत ओमराजे आणि जयराजे निंबाळकर या दोघा बंधूंनी जनसेवा, समाजकारण आणि लोकहिताची परंपरा अधिक बळकट केली आहे. त्यामुळेच अनेकांच्या भावना व्यक्त होताना एक वाक्य हमखास ऐकायला मिळते - "पवनराजे गेले नाहीत, ते ओमराजे व जयराजे यांच्या रूपाने आजही जनतेत वावरत आहेत."
आज पवनराजेंच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी दाखविलेला मार्गच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
पवनराजे हे नाव एक व्यक्ती नव्हते, तर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक होते... आणि तो विश्वास आजही ओमराजे निंबाळकर आणि जयराजे निंबाळकर यांच्या रूपाने तितक्याच ताकदीने जिवंत आहे.
"पवनराजे गेले नाहीत, ते ओमराजें व जयराजे यांच्या रूपाने आजही जनतेत वावरत आहेत."
✍🏻वैभव पारवे
#MH25News #dharashiv #pawanrajenimbalkar #OmrajeNimbalkar #jayrajenimbalkar