महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या विजयासाठी उबाठा शिवसेनेचे खासदार-आमदार मैदानात
महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या विजयासाठी उबाठा शिवसेनेचे खासदार-आमदार मैदानात
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. धाराशिव जिल्ह्यात महेश देशमुख यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी उबाठा शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी रणशिंग फुंकले असून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दौरे सुरू केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन महेश देशमुख यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडीचे नेते मतदारांशी संवाद साधत आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. तर आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनीही जिल्ह्यातील मतदारांच्या भेटी घेऊन महेश देशमुख यांच्या विजयासाठी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनबद्ध प्रचार सुरू असून, धाराशिव जिल्ह्यात महेश देशमुख यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
