ॲपद्वारे खत विक्रीमुळे शेतकरी त्रस्त; प्रणाली तात्काळ बंद करण्याची शिवसेनेची मागणी
ॲपद्वारे खत विक्रीमुळे शेतकरी त्रस्त; प्रणाली तात्काळ बंद करण्याची शिवसेनेची मागणी
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ॲपद्वारे खत विक्री प्रणालीमुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही प्रणाली तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना मुक्तपणे खत खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर ॲपमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असून सर्व्हर बंद पडणे, ॲप हँग होणे, माहिती चुकीची दिसणे तसेच व्यवहार पूर्ण न होणे अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा आवश्यक तांत्रिक ज्ञान नसल्याने या प्रणालीचा वापर करणे कठीण ठरत आहे. परिणामी पेरणी व पीक व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या कालावधीत शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून शेतीची कामेही प्रभावित होत आहेत.
शेतकरी हा ग्राहक असल्याने त्याला कोणत्याही अधिकृत खत विक्रेत्याकडून आपल्या गरजेनुसार खत खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असावे. मात्र सध्याच्या ॲप-आधारित व्यवस्थेमुळे अनावश्यक निर्बंध निर्माण होत असल्याने ही प्रणाली त्वरित बंद करून कोणत्याही तांत्रिक अटींशिवाय खत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत मा. खासदार साहेब यांनाही देण्यात आली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना संदीप पाटील आढाव (उपतालुका प्रमुख, शिवसेना), कृष्णा पाटील पराड (जिल्हाध्यक्ष), अजय हिंगमिरे (उपतालुका प्रमुख, युवा सेना शिवसेना) तसेच अशोक भाऊ भागवत (शिवसेना पदाधिकारी) उपस्थित