कपाशी पिकासाठी 5 G बियाण्यास तात्काळ परवानगी द्याअन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडणार – झुंजार छावा संघटना
कपाशी पिकासाठी 5 G बियाण्यास तात्काळ परवानगी द्या
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कपाशी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वाढते बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी आणि शेतीच्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि रोगराई यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बाजारात मिळणाऱ्या जुन्या कपाशी बियाण्यांमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत चालला आहे.
मागील काही वर्षांपासून वापरण्यात येणाऱ्या कपाशी बियाण्यांमधून उत्पादनात वाढ होत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. भरमसाठ खर्च करूनही उत्पादन कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व चांगल्या गुणवत्तेचे नवीन 5 G कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी 5 G बियाण्याकडे आशेने पाहत असून या वाणामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा गंभीरपणे विचार करून 5 G कपाशी बियाण्यास तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी झुंजार छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले असून, जर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही तर झुंजार छावा संघटनेच्या वतीने श्री. कृष्णा पाटील पराड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संदीप पाटील आढाव (शिवसेना उपतालुका प्रमुख) तसेच वर्षा कुलकर्णी (महिला प्रदेशाध्यक्ष, शिवतेज संघटना) यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.