शब्दांचा उत्सव, विचारांचा जागर आणि मराठी साहित्याचा भव्य सोहळा..
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव -अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले..
यावेळी मराठी ग्रामीण साहित्याला नवी दिशा देणारे, माती आणि शेतकऱ्यांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आवाज देणारे ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. भास्करराव चंदनशिव यांना मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. कमलाबाई चंदनशिव व कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला. तसेच साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योजकता आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले..
तसेच अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत मराठी साहित्याची समृद्ध परंपरा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून करण्यात आला..
आज कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय आणि चॅटजीपीटीचे युग असले तरी मानवी संवेदना, विचारांची खोली आणि समाजपरिवर्तनाची ताकद केवळ साहित्यामध्येच आहे. तंत्रज्ञान हे साधन असू शकते, पण समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्येच असते. त्यामुळे मराठी साहित्य डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असून अशा साहित्य संमेलनांतून विचारांची मशाल अधिक तेजाने प्रज्वलित होत राहिली पाहिजे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला..
साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि नव्या विचारांचा संगम असलेल्या या संमेलनाने धाराशिवची भूमी साहित्यप्रेमींच्या उत्साहाने भारावून गेली होती..
या वेळी आमदार विक्रम बप्पा काळे, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, सूरज साळुंके, राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, गुरु भांगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष मीना महामुनी यांच्यासह साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.