चोरीच्या पैशातून घेतली ब्रेझा आणि बुलेट; पोलिसांनी केली जप्त

चोरीच्या पैशातून घेतली ब्रेझा आणि बुलेट; पोलिसांनी केली जप्त

राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव -स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत जिल्ह्यातील अनेक घरफोडी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या अट्टल आरोपीस अटक करून त्याच्याकडून तब्बल 45 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील 32 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. 30 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अट्टल घरफोड्या करणारा आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा येथे आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना झाले.
पोलीसांनी सापळा रचून आरोपीचा शोध सुरू केला असता आरोपीने पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने त्यास पकडले. यावेळी श्रावण जमनाशा शिंदे यालाही ताब्यात घेण्यात आले.
सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता अजय श्रावण शिंदे याने धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 32 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
चौकशीत आरोपीकडून 18 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. तसेच चोरीतील काही सोन्याची विक्री करून आरोपीने ब्रेझा चारचाकी आणि नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहनांसह एकूण 45 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री. अमोल मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने केली.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक