बसवराज पाटील मुरूमकर मैदानात; भाजपने टाकला विजयाचा डाव
बसवराज पाटील मुरूमकर मैदानात; भाजपने टाकला विजयाचा डाव
धाराशिव प्रतिनिधी
लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे तीनही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बसवराज पाटील मुरूमकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संपर्क, कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे नाते आणि विकासाभिमुख प्रतिमा यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उमेदवारी जाहीर होताच लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विविध ठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते आता सक्रिय झाले आहेत.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बसवराज पाटील मुरूमकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. “ही उमेदवारी म्हणजे जनतेच्या विश्वासाची पावती आहे. विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून बसवराज पाटील मुरूमकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.