मेडशिंगा पाटीजवळ भीषण अपघात; भरधाव स्विफ्टच्या धडकेत बांधकाम मजुराचा मृत्यू, महिला गंभीर
मेडशिंगा पाटीजवळ भीषण अपघात; भरधाव स्विफ्टच्या धडकेत बांधकाम मजुराचा मृत्यू, महिला गंभीर
धाराशिव, दि. २५ प्रतिनिधी : धाराशिव-लातूर महामार्गावरील मेडशिंगा पाटी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका बांधकाम मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरमगाव येथील कस्तुरा पारवे या घरासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी धाराशिवकडे निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत घराचे बांधकाम करणारा मजूर दुचाकीवरून प्रवास करत होता. मेडशिंगा पाटीजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातात बांधकाम मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर कस्तुरा पारवे गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी धाराशिव येथील रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप
या दुर्घटनेनंतर मेडशिंगा पाटी परिसरातील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित रस्ता अनेक ठिकाणी उंच-सखल व धोकादायक झाल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
“या मार्गावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. प्रत्येक वेळी जीव गेल्यानंतर चर्चा होते; मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कायमच मौन बाळगतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
रस्त्यावरील त्रुटी तातडीने दूर करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.