बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!ठेकेदारावर कोणाचा हात? दोन दिवसांत दुसरा अपघात; तरीही ठेकेदार मोकाटच?
बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
ठेकेदारावर कोणाचा हात? दोन दिवसांत दुसरा अपघात; तरीही ठेकेदार मोकाटच?
धाराशिव ते बोरफळ रस्त्यावरील अपूर्ण काम आणि निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा जीव गेला असून प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भंडारवाडी येथील रहिवासी ओम दिलीप अंधारे (वय २० ते २५) हा युवक रोजप्रमाणे धाराशिव शहरातील काम आटोपून आपल्या गावाकडे परतत होता. संध्याकाळी सुमारे ९.०० ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान सांजा गावाच्या पुढे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हा भीषण अपघात घडला.
ओम अंधारे हा जलपरी नेट कॅफेशी संबंधित असून तो यामाहा कंपनीच्या MH 25 AU 6914 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. मात्र संबंधित ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह नसल्यामुळे त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकी थेट पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात जाऊन जोरात आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओम हा घरातील एकुलता एक मुलगा असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका स्कॉर्पिओ गाडीचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नागरिकांनी दिली. एवढ्या मोठ्या घटनांनंतरही ठेकेदाराने कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मात्र ठेकेदारावर कथित राजकीय वरदहस्त असल्यामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल करत, “ज्यांनी मतदान करून निवडून दिले, त्यांच्या जीवाची किंमत नाही का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करून या मृत्यू सापळ्याला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786