जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलची टंचाई भासू नये म्हणून वेळेत उपाययोजना करा -खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलची टंचाई भासू नये म्हणून वेळेत उपाययोजना करा -खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असून, जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा अत्यावश्यक काळात इंधनाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहेत व त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी इंधनावर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन टँकर येऊन उतरत असताना तसेच इंधन वितरणाच्या प्रक्रियेदरम्यान शासकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित राहिल्यास पारदर्शकता राखली जाऊन गैरप्रकारांना आळा बसू शकतो.
तसेच प्रत्येक पंपावर उपलब्ध असलेला दररोजचा इंधन साठा नागरिकांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी दर्शविणे आणि तोच साठा समाज माध्यमांवर जाहीर करणे गरजेचे आहे, जेणेकरून अफवा पसरू नयेत आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल.
दरम्यान, इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडूनही अपेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक परवानाधारक विक्रेत्यांनी पूर्ण रक्कम अदा करूनही वेळेवर इंधन मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी पुरवठ्याचे निकष स्पष्ट करणे तसेच मागणीप्रमाणे नियमित व सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी व पेट्रोल पंपचालक यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस नियमावली तयार करणेही गरजेचे आहे.
सदर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात व जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी आणि संबंधित तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे प्रादेशीक व्यवस्थापक,बी.पी.सी.एल./एच.पी.सी.एल/ आय.ओ.सी.एल. पाकणी डेपो सोलापूर यांना तक्रार सादर करण्यात आली असून, तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.