संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये भीम लाटबहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये भीम लाट
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव प्रतिनिधी -विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात भीम जयघोषाने वातावरण दणाणून गेले. बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती, तसेच हभप, भन्तेजी, मौलाना आणि अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला.
गेल्या २५ वर्षांपासून अठरापगड जाती-समूहांना एकत्र आणण्याचे कार्य बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे करत असून, जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाचा मान सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. शहरातील क्रांती चौक, भीमनगर येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मनोज जरांगे पाटील यांच्यासह धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष तथा सांजा गावचे सरपंच प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, विशाल शिंगाडे, सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, मसूद शेख, अॅड. परवेज काझी, पंकज काटे, बार्शीचे उद्योजक सुनील भराडीया, मौलाना अय्युब कासमी, मौलाना मुफ्ती रहेमतुल्ला, मौलाना जाफर खानसाब, मौलाना सजीयोद्दीन शेख, मौलाना कारी कलीमसाब, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते कमल धम्मो, भन्ते संघदूत, भन्ते विनीत धम्म, भन्ते सुमित बोधी, हभप प्रकाश बोधले महाराज, हभप धनंजय महाराज सांजेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन विविध धर्मगुरूंच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शरद आरगडे पाटील आणि अधीक्षक अभियंता संजय आडे यांचाही समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात धनंजय शिंगाडे यांनी उत्सवाची पार्श्वभूमी मांडत संघटनेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दलित-बहुजन समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मसूद शेख आणि प्रवीण सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. हभप प्रकाश बोधले महाराज, मौलाना जाफर खान आणि भन्ते सुमेधजी नागसेन यांनी आशीर्वचन देत समाजएकतेचा संदेश दिला, तर जातमुक्त गाव संकल्पनेचे प्रेरणास्थान शरद आरगडे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माचा आदर केला आणि त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाला अन्यायाची जाणीव झाली पाहिजे; संघर्ष केल्यास अन्याय दूर होऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याची जाणीव ठेवून समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुधीर पवार यांनी केले. क्रांती चौक, भीमनगर येथून शिस्तबद्धपणे निघालेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापुरुषांना अभिवादन करून पुन्हा क्रांती चौक येथे विसर्जित करण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात, निळ्या झेंड्यांसह आणि घोषणांनी संपूर्ण धाराशिव शहर भारावून गेले.
दरम्यान, धाराशिव शहरात आगमन होताच मनोज जरांगे पाटील यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.