वादळ आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत - आमदार कैलास पाटील

वादळ आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत - आमदार कैलास पाटील
राहुल कोरे आळणीकर 
​धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज दि. 21 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीने आणखी एक घाव घातला आहे, अशा शब्दांत आमदार कैलास पाटील यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे.

​आमदार कैलास पाटील पुढे म्हणाले की, "या भीषण परिस्थितीत एका शेतकरी बांधवाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, जी अत्यंत वेदनादायी आहे. फळबागा, उभी पिके आणि शेतीमालावर या अवकाळी संकटाचा गंभीर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे अनेक महिन्यांचे कष्ट अक्षरशः पाण्यात गेले आहेत. आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन कोणताही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे सुरू करावेत."

​हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता वर्तवली असून परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

​या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की, "मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्यावी. अशा वेळी झाडाखाली किंवा टिनशेडखाली उभे राहणे टाळावे. तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांपासून दूर राहून विशेष सतर्कता बाळगावी."

​#गारपीट #पाऊस #Rainfall #शेतकरी #farmers #धाराशिव #dharashiv #कैलासपाटील #आपत्तीव्यवस्थापन

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक