संत गोरोबा काका मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी ३ कोटी मंजूरतेरच्या वैभवात आणखी पडणार भर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
संत गोरोबा काका मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी ३ कोटी मंजूर
राहुल कोरे आळणीकर
तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे केवळ मंदिराचे सौंदर्य तर खुलणार आहेच त्यासोबत दरवर्षी दर्शनासाठी येणारे लाखो वारकरी आणि भाविक यांच्यासाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आपल्या महायुती सरकारने मंजूर केलेल्या ३ कोटी रुपयांच्या निधीतून प्रामुख्याने मंदिराच्या मूळ रचनेला साजेशी विकासकामे केली जाणार आहेत. प्राधान्याने मंदिरातील ओव्हरीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस २ कोटी रुपये खर्चून ओव्हरीचे बांधकाम केले जाणार आहे. वारी किंवा उत्सवाच्या काळात भाविकांच्या विश्रांतीसाठी आणि भजनासाठी ही जागा हक्काचे केंद्र ठरणार आहे. ओव्हरीसोबतच ऐतिहासिक वारशाचे जतन जसे की नगारखाना व स्टोन क्लेडिंगचेही काम हाती घेण्यात येणार आहे. नगारखान्याचे बांधकाम आणि मंदिराला 'स्टोन क्लेडिंग' अर्थात दगडी आच्छादन केल्यामुळे मंदिराला प्राचीन आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. या कामासाठी स्वतंत्रपणे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ एप्रिल रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला. ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला तांत्रिक बळ मिळाले होते. आमदार पाटील यांनी या तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग यात्रास्थळ योजनेत समावेश करून निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. ही कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या विकासकामामुळे तेर हे गाव केवळ धार्मिक केंद्र न राहता, एक सुसज्ज पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच तेरच्या पर्यटन व्यवसायाला बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा आत्या पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धन्यवाद मानले आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तुसंग्रहालय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसीत केली जाणार आहे. यासाठी १३ कोटी ३८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच प्राचिन तीर्थकुंड विकासासाठी ५ कोटी ११ लाख, बौद्ध स्तूप विकासासाठी २ कोटी २१ लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे. आता समाधी मंदिराच्या कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालय जवळपास २४ हजार ७६६ पुरातन अवशेषाचा संग्रह उपलब्ध आहे. या संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामही सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरातन वस्तू संग्रहालय आता या नवीन इमारतीच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.