वादग्रस्त महाकाली कला केंद्रावर अखेर कारवाई; परवाना रद्द करून सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वादग्रस्त महाकाली कला केंद्रावर अखेर कारवाई; परवाना रद्द करून सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील वादग्रस्त महाकाली कला केंद्रावर अखेर प्रशासनाने कठोर कारवाई करत त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असून केंद्र तात्काळ सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत ही निर्णायक पावले उचलली आहेत. त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा आता प्रत्यक्ष सीलिंग कारवाईसाठी सज्ज झाली आहे.
महाकाली कला केंद्राचे चालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे इतर कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत याचिका मागे घेण्याचा इशारा दिला. न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत “याचिका मागे घ्या अन्यथा फेटाळू” असे स्पष्ट झाल्यानंतर माळी यांच्या वकिलांनी माघार घेत याचिका मागे घेतली. यापूर्वी देण्यात आलेला अंतरिम दिलासाही न्यायालयाने रद्द केला, त्यामुळे प्रशासनाचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, या प्रकरणात पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही ठोस भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. तसेच महसूल व पोलीस विभागाने संयुक्त अहवाल सादर करत केंद्रातील गंभीर अनियमितता अधोरेखित केल्या होत्या.
चौकशीत महाकाली कला केंद्रात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. इमारतीसाठी आवश्यक बांधकाम परवानगी नसणे, प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग नसणे, रंगमंच व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा नसणे, अशा मूलभूत त्रुटी आढळल्या. तसेच 10 वातानुकूलित खोल्यांमध्ये नृत्य सादरीकरण चालत असल्याचे निदर्शनास आले. पारंपरिक कलाप्रदर्शनाऐवजी साउंड सिस्टीमवर नृत्य कार्यक्रम घेतले जात असल्याचेही स्पष्ट झाले.
याशिवाय छापील तिकीट व जीएसटी कलाकारांची अधिकृत माहिती पोलिसांकडे न सादर करणे, तसेच परिसरालगत बियर बार व लॉजिंग सुरू असल्यासारख्या बाबी अहवालात नमूद करण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव व त्यासंबंधित स्वाक्षऱ्यांची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे आढळले.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करत ते तात्काळ सील करण्याचे आदेश दिले. दीर्घकाळ चाललेल्या तक्रारी, चौकश्या आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या प्रकरणी निर्णायक कारवाई झाली आहे.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे कला केंद्र चालु ठेवल्यास कार्यवाहीचा इशारा जिल्हाधिकारी यांनी आदेशात दिला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवरही आता प्रशासनाची कडक नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता प्रत्यक्ष सीलिंग कारवाई किती जलदगतीने पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक