धाराशिवच्या सत्तेच्या चाव्या महायुतीकडे; विरोधकांचा खेळ खल्लासजिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची बहुमताने निवडभाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राखली जिल्हा परिषदेची सत्ता.
धाराशिवच्या सत्तेच्या चाव्या महायुतीकडे; विरोधकांचा खेळ खल्लास
जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची बहुमताने निवड
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राखली जिल्हा परिषदेची सत्ता.
उबाठाचा दारूण पराभव, ठाकरे सेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना धक्का
नगर परिषद, पंचायत समितीपाठोपाठ जिल्हा परिषदेतही राजेनिंबाळकर यांच्या वाट्याला नामुष्की
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवत मविआचा सपशेल पराभव केला आहे. भाजपच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड यांची उपाध्यक्षपदी दणदणीत निवड झाली आहे.
महायुतीचा दणदणीत विजय: ४५ विरुद्ध ९ अशा मोठ्या फरकाने मविआला 'धोबीपछाड'.
क्रॉस वोटिंगची चर्चा: महायुतीचे संख्याबळ ४४ असताना पडली ४५ मते; विरोधकांचे एक मत फुटले.
मविआला घरघर: मविआचा एक सदस्य मतदानाला गैरहजर, पदरी पडली फक्त ९ मते.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या महायुतीकडे गेल्या आहेत. एकतर्फी झालेल्या निवडणुकीत महायुतीने एकजुटीचे प्रदर्शन केले. अध्यक्ष पदासाठी भाजपच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी बाजी मारली, तर उपाध्यक्ष पदावर शिवसेनेच्या सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांनी नाव कोरले आहे.
या निवडणुकीतील सर्वात चर्चेची बाब म्हणजे मतांचे गणित. महायुतीकडे स्वतःचे ४४ सदस्य असताना त्यांना एकूण ४५ मते मिळाली. यामुळे महाविकास आघाडीचे एक मत फुटून महायुतीच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ ९ मतांवर समाधान मानावे लागले, तर त्यांचा एक सदस्य मतदानाच्या वेळी गैरहजर राहिल्याने मविआची मोठी नाचक्की झाली आहे.
विजयाची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी हा विजय विकासाचा आणि एकजुटीचा असल्याचे सांगितले. या विजयामुळे धाराशिवच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली असून, महाविकास आघाडीवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.