धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक कायापालटासाठी चालना ; भाजपच्या माध्यमातून १०८ नवे उद्योजक घडणार !आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन ; एक एप्रिलपासून नाव नोंदणीला सुरुवात


धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक कायापालटासाठी चालना ; भाजपच्या माध्यमातून १०८ नवे उद्योजक घडणार !

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन ; एक एप्रिलपासून नाव नोंदणीला सुरुवात
राहुल कोरे आळणीकर 
जिल्ह्यातील होतकरू तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळावा आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षात जिल्ह्यात १०८ नवीन उद्योजक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

केवळ उद्योग सुरू करण्याचा सल्ला न देता, तो प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने तरुणांच्या पाठीशी उभी राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प अहवाल अर्थात उद्योगासाठी आवश्यक असणारा तांत्रिक प्रकल्प अहवाल तयार करून दिला जाणार आहे. बँकांच्या माध्यमातून आगदी सुलभपणे कर्ज पुरवठा आणि अनुदान उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्यही केले जाणार आहे. उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही यंत्रणा मदत करणार आहे.

या मोहिमेत पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती इच्छुकांच्या अर्जांची छाननी करेल, त्यांच्या उद्योगाची व्यवहार्यता तपासेल आणि पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये शेळीपालन, कडबाकुट्टी कारखाना, कांदा पावडर, चिंच पावडर निर्मिती आदी कृषी आधारित उद्योग, प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास हरित इंधन, वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती आदी पर्यावरण पूरक उद्योग, इ-वेस्ट, सोलर पॅनल स्क्रॅप आणि लिथियम बॅटरी स्क्रॅप रिसायकलिंग आदी भविष्यातील तंत्रज्ञान आधारित उद्योगासह नारळ करवंटीपासून कोकोपीट आणि पारंपरिक लेदर निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी 8888627777 या क्रमांकावर वॉट्सप किंवा मेसेज द्वारे 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे

तरुणांनी केवळ नोकरीमागे न लागता 'नोकरी देणारे' बनावे

या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी १ एप्रिल २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. तसेच, महाराष्ट्र दिनी १ मे रोजी 'प्रतिष्ठान भवन, धाराशिव' येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत निवडक उद्योजकांना पुढील दिशा ठरवून दिली जाईल. जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता 'नोकरी देणारे' बनावे, हा यामागील उद्देश आहे. १०८ उद्योजकांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना हक्काचा रोजगार तर मिळेलच मात्र त्यातून अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक