सोलापूर-अक्कलकोट मार्गासाठी १०५ कोटी मंजुर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार : प्रयत्नाला यश; आमदार राणाजगजितसिंह पाटील नळदुर्ग ते अक्कलकोट दरम्यानच्या १४.१७ किमी उर्वरित कामाचा मार्ग मोकळा केंद्र सरकारचा मोठा निर्णय
सोलापूर-अक्कलकोट मार्गासाठी १०५ कोटी मंजुर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार : प्रयत्नाला यश; आमदार राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्ग ते अक्कलकोट दरम्यानच्या १४.१७ किमी उर्वरित कामाचा मार्ग मोकळा केंद्र सरकारचा मोठा निर्णय
धाराशिव प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६५२ वरील नळदुर्ग ते अक्कलकोट या विभागाच्या पुनर्वसन आणि सुधारणेच्या कामाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पांतर्गत उर्वरित १४.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे हा महत्त्वाचा रस्ता आता दोन पदरी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. आपल्या प्रयत्नाला यश आले असून विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नळदुर्ग येथील जाहीर सभेत जाहीर केल्याप्रमाणे या मार्गासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे विशेष आभारही मानले आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, हा प्रकल्प 'ईपीसी' (EPC) मोडवर राबवला जाणार असून यामध्ये बांधकामासाठी १०३ कोटी ४२ लाख रुपये आणि पुढील दहा वर्षांच्या देखभालीसाठी साधारण १७ कोटी १ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. एकूण १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या या निधीला राष्ट्रपतींच्या वतीने मंजुरी देण्यात आली असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी मंत्रालयाने कडक अटी घातल्या आहेत. काम सुरू होण्यापूर्वी, कामादरम्यान आणि काम पूर्ण झाल्यावर 'नेटवर्क सर्व्हे व्हेईकल' (NSV) द्वारे रस्त्याची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता यांना या कामाचा त्रैमासिक प्रगती अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असून अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नळदुर्ग येथे जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी शब्द दिला होता. आपण स्वतः त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बळ देणाऱ्या या मार्गाच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांची जिल्हा वासियांच्या वतीने धन्यवाद मानले आहेत.
जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार बूस्ट
या महत्त्वाच्या मार्गामुळे अक्कलकोट-नळदुर्ग आणि तुळजापूरसह प्राचीन तेर येथील पर्यटन व्यवसायाला मोठा बूस्ट मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी आपण सुरू केलेल्या प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आरखड्याला गती मिळाली आहे, संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर नळदुर्ग येथील अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या नवीन मार्गामुळे ही चारही पर्यटन स्थळे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल होतील त्यातून आपल्याला अपेक्षित रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट पूर्ण होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.