धनंजय सावंत यांच्या वाहनाला अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळलाई
धाराशिव
जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून सुदैवाने ते सुखरूप बचावले आहेत. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या दरम्यान सोलापूर–पुणे महामार्गावर बारामतीजवळ हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे मुंबई येथे झालेल्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यानंतर आपल्या फॉर्च्युनर कारने (MH 12 SE 5559) परंड्याकडे परतत होते. भिगवण परिसरातील डाळज-२ गावाजवळ त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या सुरक्षारक्षक व चालक यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, “कार्यकर्त्यांचे आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने मी या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडलो. माझी प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे कुणीही चिंता करू नये.”
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.