जकेकूर चौरस्त्यावर मृत्यूचा सुळसुळाट; माजी नगरसेवकासह दोघे ठार, एक गंभीर

जकेकूर चौरस्त्यावर मृत्यूचा सुळसुळाट; माजी नगरसेवकासह दोघे ठार, एक गंभीर

राहुल कोरे आळणीकर 
उमरगा प्रतिनिधी: उमरगा–सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्त्याजवळ मंगळवारी (दि. १०) सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात माजी नगरसेवकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथे देवदर्शन करून एक नवदांपत्य हैदराबादच्या दिशेने मारुती सुझुकी नेक्सा (क्र. टीएस 34 एफ 4706) या कारने जात होते. जकेकूर चौरस्त्याजवळ पोहोचताच कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यंकटेश ट्रॅक्टर शोरूमजवळील चहाच्या हॉटेलमध्ये घुसली.
यावेळी हॉटेलसमोर झाडाखाली बसून चहा घेत असलेले माजी नगरसेवक बळी पवार आणि लाडनशहा मुर्शद यांना कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले मेकॅनिक सचिन कोठारी हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात कारची धडक इतकी जबरदस्त होती की झाडाखाली उभ्या असलेल्या अनेक दुचाकींचा चुराडा झाला. तसेच हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूकही विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जकेकूर परिसरात शोककळा पसरली असून माजी नगरसेवक बळी पवार यांच्या निधनामुळे स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक