हृदयविकार रुग्णांची वाढ; कॅथलॅब, एमआरआय व 500 बेड सिव्हिल हॉस्पिटल तातडीने सुरू करा – आमदार कैलास पाटील यांची सभागृहात मागणी

हृदयविकार रुग्णांची वाढ; कॅथलॅब, एमआरआय व 500 बेड सिव्हिल हॉस्पिटल तातडीने सुरू करा – आमदार कैलास पाटील यांची सभागृहात मागणी
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव : जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून स्थगितीच्या राजकारणामुळे रखडलेले कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करावे, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.

सभागृहात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, सध्या केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यात कार्डियाक कॅथलॅब नसल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आरोग्य विभागाने कॅथलॅबसाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून एक वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती. ऑक्टोबर 2024 पर्यंत सुविधा सुरू होणे अपेक्षित असतानाही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दहा बेडचे हॉस्पिटल आणि कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू नसल्याने रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत असून ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

कॅथलॅबसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर व जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम रखडल्याचे त्यांनी सांगितले. 2025–26 मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली.

दरम्यान, धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या तीव्र आंदोलनानंतर मशीन धाराशिवमध्येच ठेवण्यात आली. एमआरआयचे काम पूर्ण झाले असतानाही केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नसल्याने रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचेही आमदार पाटील यांनी नमूद केले.

याशिवाय, धाराशिवमध्ये मंजूर असलेल्या 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. सुरुवातीला निधीअभावी प्रकल्प रखडला होता. पाठपुराव्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक