प्रशासनाच्या हट्टामुळे कलाकार उघड्यावर; न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू! नियम घालून द्या आम्ही त्याचे तंतोतंत पालन करु:हतबल कलाकारांनी फोडला टाहो
प्रशासनाच्या हट्टामुळे कलाकार उघड्यावर; न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू!
नियम घालून द्या आम्ही त्याचे तंतोतंत पालन करु:हतबल कलाकारांनी फोडला टाहो
राहुल कोरे आळणीकर
धाराशिव प्रतिनिधी
जिल्ह्यातील कला केंद्रांना नियमांचा बडगा उगारीत बंद केली आहेत. ती बंद करुन पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही ते सुरू करण्यात आलेली नाहीत किंवा त्या सुरू करण्यासाठी पावले उचलली नाहीत. विशेष म्हणजे आयुक्तांनी सुरू करण्याचा आदेश देऊन देखील ते जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत सुरू केलेले नाही. त्यामुळे थेट आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत जिल्हा प्रशासन आपली मनमानी करीत असल्याचे समोर आले आहे. पाच महिन्यापासून बंद असलेल्या या केंद्रातील कलाकारांची उपासमार होत असून प्रचंड हाल अपेष्टा होत आहेत. जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही आमच्या कला केंद्रांना परवानगी द्यावी. तसेच तुम्ही घालून द्याल त्या सर्व अटी नियमांचे तंतोतंत पालन करून आमची कला सादर करु. नियमाचे कुठलेही उल्लंघन होऊ देणार नाही. कारण आम्हाला कुठलाच आधार नाही. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार निराधार असून कला केंद्रास परवानगी देऊन आमचे पुनर्वसन करावे. जर तुम्ही देणार नसाल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी करीत गौरी कला केंद्रातील कलाकारांनी आर्त टाहो फोडला आहे.
जिल्ह्यातील कला केंद्रांना शासनाची परवानगी आहे. त्या नियमांचे पालन करून ते चालविली जात होती. मात्र, काहीजणांकडून नियमाचे उल्लगन झाले असे सांगत कला केंद्र बंद केले आहेत. या कला केंद्रामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार करमणुकीचे कार्यक्रम केले जात होते. या कला केंद्रामध्ये नृत्यांगना, तबला वादक, पेटी वादक व सोंगाड्या असे कलाकार या कलेच्या माध्यमातून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. विशेष म्हणजे ही कला पाहण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना ये जा करण्यासाठी टमटम, रिक्षा व इतर वाहन चालकांना देखील रोजगार उपलब्ध झाला होता. तसेच हॉटेल व्यवसाय देखील व्यवस्थित चालत होता. या हॉटेल साठी लागणारा भाजीपाला देखील या परिसरातील शेतकरी पुरविण्याचे काम करीत. त्यामुळे या परिसरातील अर्थचक्राची साखळी एक दुसऱ्याच्या मदतीने व्यवस्थित सुरू होती. परंतू, दुसऱ्या जिल्ह्यात कला केंद्रामध्ये गैरप्रकार घडला आणि त्याचा फटका धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रांना बसला आहे. त्यामुळे कलाकारांची उपासमार होतच आहे. मात्र, त्यांच्या कलेच्या जीवावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबिय देखील उघड्यावर आले आहेत. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
........
जिल्ह्यातील ६०० कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर !
सर्व प्रकारच्या कलाकारांच्या कलेला राजाश्रय पूर्वीपासूनच मिळालेला आहे. त्यासाठी शासनाने देखील कला केंद्रांना रीतसर परवानगी दिली आहे. या कला केंद्रामध्ये कलाकारांनी सादर केलेल्या कला पाहण्यासाठी अनेकजण स्वतः होऊन येत असतात. त्यांच्या आवडीनुसार कला देखील सादर केली जाते. या कलेवर खुश होऊन ग्राहक त्यांना बक्षीस देते. त्या बक्षिसावरच त्यांचा उदारनिर्वाह सुरू असतो. मात्र गेल्या पाच महिन्यापासून जिल्ह्यातील कला केंद्र बंद असल्यामुळे जिल्हाभरातील जवळपास ६०० कलाकरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून तो बिकट बनत चालला आहे.
..........
कलाकारांनी जगायचे कुठे आणि कसे ?
गौरी कला केंद्र जिल्हा प्रशासनाने दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी बंद केले. या विरोधात आयुक्ताकडे दाद मागितले असता आयुक्तांनी ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी देत तसे आदेश दिले. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप देखील ते सुरू करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पावले उचललेली नाहीत. कला केंद्र बंद असल्यामुळे या कला केंद्रातील काही कलाकार त्यांच्या घरी गेले. मात्र, अनेक कलाकारांना त्यांच्या हक्काचे घर नाही किंवा त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नाही.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कला केंद्र सुरू करावीत, अशी मागणी कला केंद्रातील कलाकारांनी केली.