ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप पालटणारचौदा कोटींचा विकास आराखडा तयार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप पालटणार
चौदा कोटींचा विकास आराखडा तयार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता चांगले यश मिळत आहे. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० कोटी ८७ लाख रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
नळदुर्ग किल्ला हा मूळचा कल्याणीच्या चालुक्य काळात बांधलेला मातीचा गढीवजा किल्ला होता. पुढे बहामणी काळात (इ.स. १३५१ ते १४८०) त्याचे रूपांतर भक्कम दगडी बांधकामात झाले. आदिलशाही राजवटीत या किल्ल्याला 'शहादुर्ग' असे नाव देण्यात आले होते. याच काळात, १६१३ मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून प्रसिद्ध 'पाणी महल' साकारण्यात आला, जो आजही अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जगभर ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून नळदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पुढील काळात त्यात आणखी वाढ व्हावी आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावे यासाठी नळदुर्ग किल्ल्याचा चौदा कोटी रुपयांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
पुणे येथील वास्तुविशारदांमार्फत तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावात अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. त्यानुसार ऐतिहासिक वस्तूंच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. किल्ल्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला हत्तीखाना, कचेरी, मशीद, रंगमहाल आणि धान्य कोठाराचे जतन केले जाणार आहे. तसेच तटबंदीच्या भेगांचे ग्राऊटींग करून त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. रणमंडल भागातील पडझड रोखणे आणि उपळी बुरुजाचे मजबुतीकरण याचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठीही या आराखड्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. बोटिंग परिसरात दगडी पायऱ्या, संपूर्ण किल्ल्यात दगडी पाथवे आणि दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छता व सौंदर्यिकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. किल्ल्याच्या भिंतींवरील झाडे-झुडपे काढणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करून हा अभिमानास्पद प्राचीन वारसा ठळकपणे पुन्हा एकदा जगासमोर मांडला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
स्थानिक युवकांना हक्काचा रोजगार : आमदार पाटील
धाराशिव जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व दुरुस्ती कामासाठी राज्य शासनाने १० कोटी ३८ लक्ष ९९ हजार ७१६ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामामुळे किल्ल्याचे रूप पालटणार आहे. अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटकही किल्ल्याला भेट देण्यासाठी येतील, पर्यायाने स्थानिक युवकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
#आमदारराणाजगजितसिंह #तुळजाभवानी #धाराशिव #नळदृगकिल्ला