तेरच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत
तेरच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत
धाराशिव प्रतिनिधी
राहुल कोरे आळणीकर
तेर येथील एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
तेर येथील कु. वैष्णवी काकासाहेब देवकते, कु. श्रुती गोरोबा सुतार, चि. वैष्णव दत्ता बनसोडे आणि चि. ओंकार राजेंद्र धुमाळ यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस शिक्षणासाठी पात्रता मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यापूर्वी त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्याच वेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
दिलेल्या शब्दाची पूर्तता करत संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे व त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यापुढील काळातही शिक्षणाच्या प्रवासात कोणतीही अडचण आल्यास सदैव मदतीस तयार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. आपल्या भागातील विद्यार्थी डॉक्टर बनून समाजसेवेचे महान कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.