जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच काळ्या मातीवरच बांधकामाचा फार्सजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेफ्टी टँक खचणारनिकृष्ट दर्जाचे पितळ झाकण्यासाठी काळ्या कुट्ट अंधारात उरकले काम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच काळ्या मातीवरच बांधकामाचा फार्स
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सेफ्टी टँक खचणार
निकृष्ट दर्जाचे पितळ झाकण्यासाठी काळ्या कुट्ट अंधारात उरकले काम



धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील नागरिक विविध कामासाठी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने येतात. मात्र त्यांना शौचालयाची सुविधा नसल्यामुळे त्यांची कुटुंबांना होत होती. विशेषतः यामध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दक्षिण बाजूस शौचालय बांधकामाचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याचा पाया खोदल्याचे दाखवले असले तरी मुरूम अथवा खडकापर्यंत तो न खोदताच मातीवरच बेसमेंट बेड केले आहे. या बेडचे काम इतरांना दिसू नये किंवा निकृष्ट व दर्जाहीन कामाचे पितळ उघड पडू नये यासाठी ते काळ्या कुट्ट अंधारात रातोरातच उरकण्याचा पराक्रम ठेकेदाराने केला आहे. त्यामुळे तो पाया खचण्याची शक्यता असून ते बांधकाम देखील ढासळू शकते. विशेष म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याचा फार्स कशासाठी ? केला जात आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांसाठी सुरु असलेल्या सार्वजनिक शौचालय सेफ्टी टँकचे बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रवेशद्वारा समोरील दक्षिण बाजूस विहिरीलगत शौचालय सेफ्टी टॅंक बांधण्यात येत आहे. त्याचा पाया जेसीबीद्वारे अंदाजे १० फुटांपर्यंत खोदला आहे. मात्र, मुरूम अथवा खडक लागला नाही. जिथपर्यंत पाया खोदलात तिथपर्यंत काळी मातीच निघाली. त्यामुळे काळ्या मातीमध्ये सेफ्टी टँक सारख्या खोल बांधकामांची रचना करताना विशेष कौशल्य, योग्य मोजमाप व दर्जेदार साहित्याची आवश्यकता असते. मात्र, या ठिकाणी ना योग्य माप घेतले गेले, ना मातीची घसरण रोखण्यासाठी तांत्रिक पद्धती वापरण्यात आल्या. ठेकेदाराने चक्क काळ्या मातीवरच बेसमेंट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जर काळी माती असेल तर मशीनद्वारे खडकापर्यंत होल घेऊन खडकापासून पाया खोदला तिथपर्यंत पिलर उभा करणे अत्यावश्यक व बंधनकारक असते. मात्र ठेकेदाराने याचा अवलंब केलाच नाही. मातीवरच बेड करून वरील काम सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. मातीवर बेड करणे म्हणजे शेणाच्या ढिगार्‍यावर बंगला बांधल्यासारखेच तर नाही ना ? कारण सेफ्टी टॅंकचे बांधकाम पक्के करणे आवश्यक असते. परंतू, जर पायाच कच्चा असेल तर डोलारा टिकणार कसा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

..........

काळी माती पावसात भिजून ती फुगते तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक होते. त्यामुळे पावसात बांधकाम फुगते तर उन्हाळ्यामध्ये बांधकामास तडे जाऊन भेगा पडतात. सेफ्टी टँकच्या बांधकामासाठी टेंडरमध्ये दिलेल्या निकषांप्रमाणे काम होते किंवा नाही ? हे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खास अभियंत्याची नियुक्ती केलेली असते. त्यांच्याच देखरेखीखाली काम करणे अपेक्षित असते. मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाचे जर पायाभरणी बांधकाम करण्यात येत असेल तर संबंधित अभियंता नेमके कशाची देखरेख करतात ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण शासकीय नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या दरम्यान असते. विशेष म्हणजे शासकीय बांधकामासाठी देखील सर्वसामान्यपणे हाच नियम असतो. मात्र, याच्या नेमके उलटे काळ्या मातीवरच काळ्या कुट्ट अंधारात निकृष्ट व काळे कारनामे करण्याचा उद्योग उरकला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक