अर्चनाताई पाटील यांच्या जनसंवाद दौर्यास वाढता प्रतिसादलाडक्या बहिणींनी केला आमदार पाटील यांच्या विजयाचा संकल्प
अर्चनाताई पाटील यांच्या जनसंवाद दौर्यास वाढता प्रतिसाद
लाडक्या बहिणींनी केला आमदार पाटील यांच्या विजयाचा संकल्प
राहुल कोरे
धाराशिव, दि. 13 -
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयासाठी तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील लाडक्या बहिणींनी संकल्प केला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या जनसंवाद दौर्यास माता भगिनींसह सर्वसामान्य मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा, मानेवाडी, धाराशिव तालुक्यातील चिखली येथे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ अर्चनाताई पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींसाठी भाजपा महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणे आवश्यक आहे. गावागावांचा सर्वांगीण विकास आणि महिलांच्या सन्मानासाठी महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 म्हणजेच वर्षाला 25 हजार 200 रुपये मिळणार असल्याचे अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. यातून जिल्ह्याचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास घडून येणार आहे. विकासाचा हा ओघ कायम ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून महायुतीला आपल्या गावातून मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहनही अर्चनाताई पाटील यांनी केले. यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.