महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची लाच पोहोचली कोटीवर
*महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची लाच पोहोचली कोटीवर
महाराष्ट्रामध्ये स्वच्छ व निर्भ्रश्ट शासन देण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि " ना खावूंगा - ना खाने दुंगा " अशी शेखी मिरविणाऱ्या महान नेत्यांच्या नाकावर टिच्चून, आज महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आकडा, हजारावर - लाखावर नाही तर कोटिवर पोहोंचला आहे.
पोरशे कर अपघात प्रकरणातील पोलीस कमिश्नर, डीन व वरिष्ठ डॉक्टरांच्या भ्रष्टाचाराची साखळी आपण उघड्या डोळ्यानी पाहिली. पूजा खेडकरला बोगस अपंगाचे प्रमाणपत्र, बोगस मार्क व बोगस नेमणुका देण्यामध्ये किती कोटींचा भ्रष्टाचार झाला असेल, याची कल्पना देशवासियांना आलेली आहेच. अशी भ्रष्टाचाराची दररोज शेकडो प्रकरणे भारत देशात घडतात, उघडी पडतात, परंतु कोणतेही सरकारने त्यावर कठोर पावले उचलायला तयार नाही. कारण भ्रष्टांची व सरकारमधील लोकांची कदाचित मिली भगत झाली आहे.
हे भ्रष्ट प्रकार थांबविण्याची मुख्य जबाबदारी शासनात बसलेल्या नेत्यांची व नेतृत्वाची असते. त्यादृष्टीने आमचा कोनता तरी सत्ताधारी नेता ठोस प्रयत्न करताना सध्या दिसतोय काय ? नक्कीच नाही !! ज्यांनी भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन भारतीय जनतेला देउन, व काँग्रेस काळातील कथित भ्रष्टाचाराचे भांडवल करून सत्ता मिळविली, ते आज जबादारी टाळत आहेत. मग हा भ्रष्टाचार थांबणार कधी? की थांबनारच नाही कधी.
या भ्रष्टाचारामुळे एकही विकास योजना परिपूर्ण व गुणवत्तापूर्ण बनत नाही. दहा वर्षासाठी बांधलेला रोड दोन वर्षात उखडून संपून जातो. सत्तर वर्षासाठी बांधलेली सरकारी शाळेची इमारत पंधरा वर्षात जीर्ण होत आहे. सरकारी कामासाठी आलेला ७५% पैसा भ्रष्टाचारात वाहून जात आहे. सध्या महाराष्ट्रातील व देशातील एकही सरकारी काम गुणवत्तेचे होत नाही. जनतेने कररूपाने दिलेला पैसा, जनतेच्या विकासासाठी नाही लागता, भ्रष्ट नेते व अधिकाऱ्यांच्या घशात जात आहे. वर्षाकाठी डजनावारी सहकारी कारखाने व मल्टीस्टेट ब्यांका बुडत आहेत.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेने आता जागे होण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या संसदेने कायदा मंजूर करून, देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी नेमलेले केंद्रातील लोकपाल व राज्यातील लोकायुक्त काम का करत नाहीत ? की त्यांना काम करू दिले जात नाही. कोण आहेत ते लोक जे लोकापालाना स्वायत्तपणे काम करू देत नाहीत ? या प्रश्नाची उत्तरे आता भारतीय तरुणांनी सरकाराला विचारली पाहिजेत. अन्यथा आमचा विकास प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही.
धर्मवीर कदम
सचिव, फूक, धाराशिव.