जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करुया* पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत*भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात*




*जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करुया*
        पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

*भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात*
धाराशिव,दि.२६ (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून काम करावे.शासनाच्या विविध योजना,उपक्रम व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करुया आणि यामधून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवूया असे आवाहन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
             आज ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे-पाटील,आ.राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी संतोष भोर,राजकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती.                                  
              पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलताना पुढे म्हणाले की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी यावर्षी मोठ्या उत्साहात यावर्षी साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवन प्रसंगावर आधारीत महानाट्य आणि महाराष्ट्राच्या समृध्द संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे देखील आयोजन राज्यात करण्यात येत आहे.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना देवून विविध योजनांचा लाभ देखील देण्यात येत असल्याचे सांगितले.              
              जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष मोहिम "माता सुरक्षित, घर सुरक्षित" या मोहिमेव्दारे शहरी भागातील एकूण ८३ हजार ८४८ मातांची मोफत आरोग्य तपासणी करुन १५७ मातांच्या मोफत शस्त्रकिया करण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ सावंत पुढे म्हणाले,“जागरूक पालक सदृढ बालक" ही मोहिम राबविण्यात आली.१८ वर्षावरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी "निरोगी आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे" ही मोहिम सुरु करण्यात आली.या मोहिमेमध्ये आतापर्यंत ४ लाख २९ हजार ५३९ इतक्या पुरुषांची तपसणी करून उपचार करण्यात आले.जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरीकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून धाराशिव जिल्ह्यात प्रथमच "फिरता दवाखाना स्थापन करण्यात आला.शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत ५० खाटांच्या क्रिटीकल केअर युनिटचे  बांधकाम करण्यासाठी रक्कम २३ कोटी ७५ लाख रुपये,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत १ कोटी २५ लाख, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  १ कोटी रुपये इतके अनुदान मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 
              परंडा येथील ५० खाटांच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास तसेच १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,भूम येथील ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे.वाशी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ३० खाटांचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे.२४ कोटी ५३ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.  भूम तालुक्यातील वालवड येथे नवीन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. १७ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.असे पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.    
                जिल्ह्यात माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी १ लाख ७१ हजार  शेतकऱ्यांना १२४ कोटी रुपये इतका निधी सुधारीत संगणकीय प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले,भारत सरकारच्या भौगोलीक मानांकने प्रदान करणाऱ्यांकडून जिल्ह्यातील कुंथलगिरी खवा आणि श्री.क्षेत्र तुळजाभवानीची कवड्याची माळ या उत्पादनास भौगोलीक मानांकन प्राप्त झाले आहे.यामुळे या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.जिल्हा प्रशासनाने सुमारे १ हजार एकर क्षेत्रावर रेशीम लागवड करण्याचा संकल्प महारेशीम अभियानाव्दारे अंमलात आणला आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणूक विषयासंदर्भात भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी केलेल्या उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट अधिकारी म्हणून दोघाचीही राज्यस्तरावरुन निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचेही अभिनंदन केले. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये दहन/दफनभूमी नाही,अशा गावांचा संबंधित गटविकास अधिकारी यांचेमार्फत खाजगी वाटाघाटीने थेट जमीन खरेदीचे १४२ प्रस्ताव प्राप्त झाले आहे.त्यामुळे या गावांना दहन/दफनभूमीसाठी जागा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
               यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन हनूमंत पडवळ यांनी केले. कार्यक्रमाला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव,नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           
                         
                     *****

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक