एनव्हीपी शुगर शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करणार - खा. राजेनिंबाळकरप्रतिटन 2700 रुपये भाव देण्याची चाचणी हंगाम शुभारंभप्रसंगी घोषणा
प्रतिटन 2700 रुपये भाव देण्याची चाचणी हंगाम शुभारंभप्रसंगी घोषणा
धाराशिव
राहुल कोरे
एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. (NVP SUGAR) हा कारखाना शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करणार आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामकाज बघून बाकीच्या गुळ पेट्या चांगले काम करतील, असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (OMPRAKASH RAJENIMBALKAR) यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन 2700 रुपये भाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ दि.24 सप्टेंबर रोजी गव्हाणीत उसाची मोळी टाकून खा. राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जागजी येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथराव सावंत गुरुजी, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, ऊस उत्पादक शेतकरी हनुमंतराव देशमुख, हभप काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, सुभाष पाटील, अभिजीत मगर, सुधाकर साळुंके, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले, तुळशीदास जमाले, काकासाहेब मिसाळ, जहॉंगीर सय्यद, बाबासाहेब शिंदे, साई श्रुती इंडस्ट्रीजचे सोमनाथ जानते, सचिन शिंदे, आप्पासाहेब पाटील, धनंजय पाटील व नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या भागात साखर कारखाना उभा करण्यात यावा अशी मागणी होती. त्यामुळे हा कारखाना असला तरी शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असे त्यांनी सांगितले. पूर्वी उसाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे ऊस कारखान्याकडे जातो का नाही ? त्यामुळे उसाला किती भाव देईल ? याची खात्री नव्हती. मात्र सध्या कारखानदारी क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या कारखान्याचा होणारा नफा हा प्रथम ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन पुरवठादार, बॅंक व शेवटी मालक अशी भूमिका घेणारा प्रायव्हेट क्षेत्रातील हा एकमेव कारखाना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नानासाहेब पाटील म्हणाले की, वडील व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते दि.22 सप्टेंबर 2011 रोजी या कारखान्याचे भूमिपूजन केले. उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम एक वर्षाने केला, मात्र या कार्यक्रमास वडील व आई दोघेही हयात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच खा. राजेनिंबाळकर यांचे कर्तृत्व पाहायला त्यांचे वडील देखील हयात नाहीत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ध्येय असते, की आपण केलेले काम बघायला आपले आई-वडील असावेत अशी अपेक्षा असते. उसाची मोळी आज टाकली असली तरी ८ ते १० ऑक्टोबरला सुरू होईल. कारखाना गुणवत्तेवर चालविला जाणार असून शेतकऱ्यांनी देखील ऊस गळपासाठी देताना गुणवत्ता, परिपक्वता व साखरेचे प्रमाण याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नानासाहेब पाटील तर सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. यावेळी शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

