वडार समाजाकरिता पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापनाधाराशिव येथे समाजबांधवांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा
धाराशिव येथे समाजबांधवांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा
राहुल कोरे धाराशिव
वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करुन 50 कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे जाहीर होताच आज (दि.9) धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडार समाजाच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वडार समाजाचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणारे औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार, तुळजापूर-धाराशिवचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटील, मा.आ.सुजितसिंहजी ठाकूर यांचे अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना व समस्त वडार समाज बंधू-भगिनींंच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्रातील कष्टकरी वडार समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशातील इतर राज्याप्रमाणे संवैधानिक सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही वडाराचा समाज शैक्षणिक आर्थिक व पर्यायाने सामाजिक विकास झालेला नाही. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. लातूर येथे झालेल्या मेळाव्यात या मागणीला मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शविली होती. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती यावर्षीच्या अर्थसंकल्पात 50 कोटी निधी देण्याची घोषणा श्री. फडणवीस यांनी केली. याचे वृत्त कळताच धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे मराठवाडा संयोजक तथाअखिल भारतीय वडार समाज संघटनेेचे प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी (मामा) मंजुळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह शंकर फुलारे, शंकर विटकर, रवि मंजुळे, नवनाथ यमपुरे, संदीप इंगळे, मनोज पवार, निलेश जाधव, प्रकाश पवार, सुभाष धोत्रे, मनोज धोत्रे, दत्ता जाधव व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडार समाजाला अखेर न्याय - मंजुळे
वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या अनेक वर्षाच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी न्याय दिला असल्यामुळे स्थापनेमुळे समाजाचे मागासलेपण दूर होणार आहे. यासाठी औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार, तुळजापूर-धाराशिवचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटील, मा.आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यामुळे समाजाच्या मागणीला यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे मराठवाडा संयोजक तथा अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेेचे प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी (मामा) मंजुळे यांनी व्यक्त केली.