कळंब रोड रेल्वे स्टेशनला रेल्वे थांबा मिळण्यासाठी अन्न त्याग आंदोलन२५ वर्षापासून रेल्वे प्रशासन दरबारात लढा सुरुच
२५ वर्षापासून रेल्वे प्रशासन दरबारात लढा सुरुच
राहुल कोरे धाराशिव
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनला सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी रेल्वे आंदोलन परिषदवतीने परिषदेचे अध्यक्ष व मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन दि.२ मार्च रोजी करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे इंग्रजांच्या काळापासून म्हणजेच १९०५ या ठिकाणी रेल्वे थांबा देण्यात आलेला आहे. तर २००६ पूर्वी नॅरो गेज रेल्वे होती. मात्र २००६ नंतर ब्रॉडगेज रेल्वे सुरु झाल्यापासून या ठिकाणचा थांबा बंद करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी ज्या ठिकाणी जो दर्जा दिलेला आहे तो तसाच ठेवून सर्व रेल्वे थांबे सुरू ठेवावेत असे सांगितले होते. या रेल्वे स्थानकाला सी दर्जा दिलेला असताना देखील या ठिकाणी रेल्वे थांबवली जात नाही. या रेल्वे स्थानकाशी निगडित परिसरातील ५० गावातील शेतकरी, व्यापारी व नागरिक यांचे व्यवहार निगडित आहेत. या रेल्वे स्थानकाचे उत्पन्न ३६ हजार रुपयांचे होते. तसेच रेल्वे बोर्डाच्या तिकीट यादीवर कळंब रोडचे नाव आहे. मात्र अधिकारी प्रवाशांना या ठिकाणचे तिकीटच देत नाहीत होऊन रेल्वे रूळ, स्लीपर व खडी आदी साहित्य या रेल्वे स्टेशनवर आलेले होते. परंतू ते साहित्य व मटेरियल राजकीय दडपणाखाली दुसरीकडे नेण्यात आलेले आहे. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी नक्की थांबा देण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र अद्यापपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. तसेच रेल्वे विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयाकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मागणी केली. मात्र अद्याप कोणत्याच कार्यालयाकडून कोणतेही लेखी उत्तर आलेले नाही. निष्ठुर व अन्यायी रेल्वे अधिकारी याबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करीत नसल्यामुळे हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
यावेळी तानाजी जमाले, तुळशीदास जमाले, डॉ. धनंजय करंजकर, उपसरपंच प्रताप करंजकर, तेजस भालेराव, गणेश करंजकर, विशाल जमाले, अमोल निकाळजे, दादासाहेब भालेराव, सुनील होळेकर, विनायक भालेराव, बाबासाहेब भालेराव, देविदास करंजकर, शरद होगले, भगवान होगले, शरद होगले, सकाहरी पंडित, सुभाष धनके, मिलिंद जोशी, पप्पू बारबोले, शंकर कांबळे, दिलीप पानढवळे, बलभीम काळे, किशोर कदम, अर्जुन वाकळे, धर्म ढमे, बालाजी नाईकनवरे, शंकर गायकवाड, भीमा कुंभार, विजयसिंह जमाले, हारुण शेख, संजय वाघ, वैभव भालेराव, महादेव भडके, दिगंबर लांडगे, अजित निकाळजे, हरिश्चंद्र भडके, शिवाजी शिंदे, बाबू कोरे, महादेव गायकवाड, रामचंद्र जमाले, जगन्नाथ सदावर्ते, आलम कोतवाल, केतन कदम, महेबूब तांबोळी, अरबाज तांबोळी, फरीद पठाण, महम्मद तांबोळी, बालाजी सावंत, मानाजी होगले, शहाजी मुळूक, गजेंद्र जमाले, निशांत कांबळे, दादा कांबळे, शिवा कोरे, मुख्तार शेख, प्रभाकर ढमे, समाधान देडे, धनाजी कोरे, इस्माईल पठाण, माणिक घोडके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
एक महिन्यात थांबा न दिल्यास तीव्र आंदोलन - कोरे
गेल्या २५ वर्षापासून कळंब रोड या रेल्वे स्थानकावर थांबत असलेला रेल्वे थांबा बंद करण्यात आला आहे. यासाठी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री व रेल्वे अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरवा करण्यात येत आहे. मात्र केवळ आश्वासनाच्या पलीकडे दुसरे काहीच होत नसल्यामुळे एक महिन्यापर्यंत आम्ही रेल्वे प्रशासनाला अल्टीमीटर दिला आहे. जर एक महिन्यापर्यंत हा थांबा पूर्ववत सुरू न केला तर या परिसरातील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोंडाप्पा कोरे यांनी दिला.
चौकट
तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल - जमाले
आजपर्यंत रेल्वे मंत्री व अधिकारी यांच्याकडे विनंती, निवेदने वारंवार देऊन हा थांबा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. मात्र सतत करू असे आश्वासन देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची सुविधा उपलब्ध करावी. जर सकारात्मक निर्णय एक महिन्यापर्यंत घेतला तर आनंदच आहे. मात्र समाधानकारक निर्णय न घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल व होणाऱ्या परिणामास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा तानाजी जमाले यांनी दिला.
चौकट
१९४१ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथे भारतातील पहिली महार-मांग वतनदार परिषद घेतली आहे. त्यामुळे या गावात फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी रेल्वे थांबा सुरू करून या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी तेजस भालेराव यांनी केली.
चौकट
सर्वात जास्ती तिकीटांची विक्री तरीही दुर्लक्षित का ?
कुर्डूवाडी ते लातूर दरम्यान असलेल्या सर्व रेल्वे स्थानकांच्या सर्वात जास्त प्रवासी तिकिटांची विक्री होत होती. तसेच कळंब रोड रेल्वे स्थानकाची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात शेतमाल, व्यापारी व प्रवासी पुणे, मुंबई व पंढरपूर व हैद्राबाद आधी ठिकाणी प्रवास करतात. मात्र रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर चा असलेला थांबा देखील बंद करून या परिसरातील नागरीकांची गैरसोय केली आहे. त्यामुळे या ठिकाणचा सारासार विचार करून लवकरात लवकर हा रेल्वे थांबा सुरू करावा, अशी मागणी दिलीप करंजकर यांनी केली.
राहुल कोरे आळणीकर