शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ उमाकांत कुलकर्णी यांची माहिती
शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ
उमाकांत कुलकर्णी यांची माहिती
राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद : ( ता. ८ ) राज्य मंत्रिमंडळाने दि. २२/१२/२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , जिल्हा परिषद , नगर परिषद , नगर पालिका , महानगरपालिका तसेच मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय , अध्यापक विद्यालय , सैनिकी शाळांमध्ये सन २००० साली तत्कालीन सरकारने शिक्षणसेवक योजना लागू केली. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित शिक्षणसेवकांना रुपये ६००० ( प्राथमिक व उच्च प्राथमिक ) रुपये ८००० ( माध्यमिक ) रुपये ९००० ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय ) अशा अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी , याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मा. आमदार नागोराव गाणार व मा. आमदार भगवानराव साळुंखे यांच्या नेतृत्वात यासंदर्भात निवेदने देऊन मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. याची सकारात्मक दखल घेत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. ०७ फेब्रुवारी , २०२३ रोजी शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार शिक्षणसेवकांना रुपये १६,००० ( प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ) रुपये १८,००० ( माध्यमिक शाळा ) रुपये २०,००० ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय ) याप्रमाणे सुधारीत मानधन मिळणार आहे. मानधनातील ही वाढ दि. ०१ जानेवारी , २०२३ पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. सदर शासन निर्णयाचे स्वागत नंदकिशोर झरीकर , सुरेश पठाडे , नयनाताई जहागिरदार , उमाकांत कुलकर्णी , रमेश गटकळ , किरण गरड आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील शिक्षणसेवकांमधून मानधन वाढीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.