हा नव्हे सेंद्रिय शेती गावागावांमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करणार - डॉ. ओंबासे श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटनसेंद्रीय व नैसर्गिक शेती मालासह विविध स्टॉलची उभारणी लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ
श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
सेंद्रीय व नैसर्गिक शेती मालासह विविध स्टॉलची उभारणी
लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ
उस्मानाबाद दि.१० (प्रतिनिधी) - आपण जोपर्यंत एखादी गोष्ट बघत व अनुभवत नाही. तोपर्यंत त्याचे अनुकरण करीत नाही. त्यामुळे आपल्यात बदल घडत नाही हे सत्य आहे. कारण आज गावागावात बैल दिसत नसून ट्रॅक्टरची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पन्न घटले आहे. हे टाळण्यासाठी व उत्पादनावरचा खर्च कमी करण्यासाठी गावागावात सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२३ उद्घाटन प्रसंगी दि.१० फेब्रुवारी रोजी केले.
उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टडी यांच्या मैदानात श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना (बाळासाहेब) चे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, दत्ता मोहिते, प्रगतशील शेतकरी त्रिबंक फंड, आत्मा प्रकल्पाचे संचालक जितेंद्र शिंदे, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेणे आवश्यक आहे. कारण एकच पीक घेतले व नैसर्गिक आपत्ती कोसळली तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडून व आधार नाहीसा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर मात करण्यासाठी अनेक पिके घेतल्यास नक्कीच ते फायदेशीर असल्याचे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. विशेष ज्वारी, बाजरी व तृणधान्य ही पिके घ्यावीत. गव्हाचे अन्न खाल्ल्यामुळे मधुमेह वाढतो त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तर ज्वारी व बाजरी या अन्नाचा किमान दिवसातून एक वेळेस तरी आपल्या जेवणामध्ये समावेश करायलाच हवा, असे आवाहन त्यांनी केले. त्याबरोबरच वरई, नाचणी, राजगिरा आदींसह इतर तृणधान्याचा वापर करावा. तसेच रासायनिक खतामुळे जमिनीतील जिवाणूंचा मृत्यू होत असल्यामुळे सेंद्रिय शेती प्रत्येक गावात व्हायला हवी. तर जलयुक्त कामात अभियानचा दुसरा टप्पा सुरू होत असून तलावातील गाळ, ओढा, नाला, नदी सरळीकरण आदी जास्तीत जास्त कामे करून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना राहुल गुप्ता म्हणाले की कोरोना नंतर हा कृषी महोत्सव होणे फार गरजेचे होते. हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरा होत असून पूर्वी सूर्यफूलाची पिके घेतली जात होती. तर आता ऊस व इतर पिके घेतली जात आहेत. त्यामुळे अनुकूल हवामानावर आधारित पिके घेणे आवश्यक आहे. तृणधान्य पिके घेण्यासाठी उद्दिष्ट ठरविले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन केले. विशेष म्हणजे ज्यांना यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांचा कृषी दौरा देखील केला जाईल. तर रेशीम शेतीसाठी तुती लागवडीचे दीड हजार शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले असून पन्नास टक्के प्रस्तावांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असल्यामुळे इतर पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच अतुल कुलकर्णी म्हणाले की, सर्वप्रथम ३० वर्षांपूर्वीपासून माझ्या मामांनी सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चांगले शेतकरी म्हणून त्यांना सरकारने गौरविले आहे. मात्र आपल्याकडे असलेल्या शेतीपैकी काही क्षेत्रावर सेंद्रिय शेती केल्यास त्याचा फायदा तीन वर्षानंतर मिळतो असे सांगत गेल्या ६ महिन्यांपासून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक असून त्यासाठी प्रशिक्षक तयार करून शेतकऱ्यांचे गट तयार करण्यासह सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून तर कार्यक्रम स्थळी दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी त्रिंबक फंड, डेकोरेटर्स खरपुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माचे उपसंचालक बालाजी किरवले, तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव (उस्मानाबाद), मिलिंद बिडबाग (लोहारा व तुळजापूर), बारवकर (उमरगा), आबासाहेब रुपनवर (परंडा), संतोष कोयले (वाशी), संजय गायकवाड (भूम) आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक जितेंद्र शिंदे यांनी तर सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी व उपस्थिततांचे आभार अभिमन्यू काशीद यांनी मानले. यावेळी महीला आर्थिक विकास महामंडळ, उमेद व कृषी सखी बचत गटाच्या महिला, शेतकरी, नागरिक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
यावेळी या ठिकाणी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, दशपर्णी अर्क, शेती उत्पादन केलेला माल आदींसह विविध शासकीय योजनांची माहिती जनतेला मिळावी यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचे फीत कापून उद्घाटन करीत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधितांकडून सविस्तर माहिती जाणून घेत त्यांच्याशी हितगुज साधले.
चौकट
या कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत हे अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून दिला. तो संदेश धनंजय सावंत यांनी उपस्थितांना वाचून दाखवू दाखविला. तर रासायनिक शेतीमुळे शरीराचे आरोग्य बिघडले असून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन धनंजय सावंत यांनी केले.
चौकट
लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ही नव्याने ओळख झालेली आहे. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासकीय योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमास उपस्थित राहणे अत्यावश्यक होते. मात्र सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र त्यांनीच दांडी मारली. तर प्रमुख उपस्थितांमध्ये खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. विक्रम काळे, आ. सुरेश धस या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील या कार्यक्रमाकडे ढुंकून देखील पाहीले नाही. विशेष म्हणजे दररोज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उठसूट कांगावा करणाऱ्या याच लोकप्रतिनिधींनी खास शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे कशामुळे पाठ फिरवली ? याचीच चर्चा दिवसभर कृषी महोत्सव स्थळी मोठ्या चवीने चर्चिली जात होती.