रमाबाई आंबेडकर नामफलकावरुन दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई करावी
राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - रबर नगर भागातील उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या माता रमाबाई आंबेडकर या नामपलकावरून जातीय दंगल घडविण्याच्या उद्देशाने काही समाजकंटक नुकसान करीत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.९ फेब्रुवारी रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद शहरातील रमाई नगर भागातील उड्डाणपुलावर माता रमाबाई आंबेडकर असा नामफलक आहे. तो नामफलक शहरातील काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काढून टाकण्याचा प्रयत्न केला असून नामफलकाची लोखंडी पट्टी कापून त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे. रमाबाई आंबेडकर यांची 125 वी जयंती संपूर्ण देशात साजरी होत असताना जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची कृती केली जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधितांवर लवकरात लवकर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा व योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, जिल्हा प्रवक्ता ऍड के.टी. गायकवाड, शेखर बनसोडे, शाखाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, शितल चव्हाण, सविता कांबळे यांच्या सह्या आहेत.