भाजपाचं ठरलं: धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी अखेर नेहा राहुल काकडे यांना अधिकृत उमेदवारी?
भाजपाचं ठरलं: धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी अखेर नेहा राहुल काकडे यांना अधिकृत उमेदवारी?
धाराशिव: धाराशिव नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला भाजपातील तिढा अखेर संपुष्टात आला आहे. गत काही दिवसांत झालेल्या सलग बैठका, चर्चा आणि नेतृत्वाच्या विचारमंथनानंतर नेहा राहुल काकडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला असून काहीच क्षणांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी सातत्याने काम करणारे राहुल काकडे हे एकनिष्ठ आणि जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची ही दीर्घकाळाची निष्ठा आणि जनसंपर्काचे भक्कम जाळे याचाच फायदा त्यांच्या पत्नी नेहा काकडे यांच्या उमेदवारीला मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. वरिष्ठ नेतृत्वाने ‘निष्ठा, स्वच्छ प्रतिमा आणि जिंकण्याची क्षमता’ या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे भाजपातील इतर इच्छुकांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉबिंग, फोन कॉल्स, दबाव तंत्रांनंतरही नेतृत्वाचा निर्णय काकडे यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत आहेत. शहरातील राजकीय वर्तुळातही या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. धाराशिवमध्ये नेहा काकडे यांचा संपर्क असून असल्याने, शांत आणि संयत स्वभावाच्या नेहा काकडे यांच्यामुळे पक्षाला निवडणुकीत थेट फायदा होईल, असा भाजपा नेतृत्वाचा अंदाज आहे. दरम्यान, भाजपाच्या शहर कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. “एबी फॉर्म कोणाला?” या प्रश्नाला आता स्पष्ट उत्तर मिळाले असून, अधिकृत घोषणा केवळ औपचारिक राहिली आहे.